14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अनोखा विक्रम केला आहे. रविवारी स्वच्छ भारत मोहिमेदरम्यान भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी केवळ 14 मिनिटांमध्ये संपूर्ण वंदे भारत ट्रेन स्वच्छ करण्याचा कामगिरी करुन दाखवली आहे. बरं हे काम केवळ एका ट्रेनमध्ये करण्यात आलं नाही तर अनेक ट्रेन्स अवघ्या 14 मिनिटांत साफ करण्यात आल्या. सध्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जपानमधील बुलेट ट्रेन साफ करण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ लागतो असं सांगितलं जातं. भारतामध्येही वेगाने ट्रेनची साफसफाई करण्यासंदर्भातील मोहिमेला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी दिल्ली कँट रेल्वे स्थानकामध्ये हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे स्टेशनवरील सेमी हायस्पीड- ट्रेन्सच्या सफसफाईचा कालावधी 4 ते 5 तासांवरुन थेट 14 मिनिटांपर्यंत कमी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिर्डी आणि सोलापूरसहीत देशातील अहमदबाद, कासरगोड, पुरी, गुवाहाटी, रांची आणि चेन्नईबरोबरच इतर स्थानकांवर 29 हून अधिक वंदे भारत ट्रेन्सची वेगाने साफसफाई करत ही मोहीम सुरु करण्यात आली. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत काल एकाच वेळी देशातील अनेक स्थानकांवर या विक्रमी वेळेत ट्रेन स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलं. आता या स्थानकांवर रोज अशाच प्रकारे गतीमान वेळेत या ट्रेन्स स्वच्छ करुन पुढील फेरीसाठी तयार सज्ज ठेवल्या जातील असं सांगण्यात आलं आहे.
#WATCH | Delhi: A 14-minute cleanliness drive was conducted for the Rani Kamalapati-Hazrat Nizamuddin Vande Bharat Express train at Hazrat Nizamuddin Railway Station. pic.twitter.com/A1GfkmG2tb
— ANI (@ANI) October 1, 2023
वंदे भारत ट्रेन्स वेळेवर सुटाव्यात आणि परतीच्या फेरीमध्येही त्यांनी वेळेत माघारी फिराव्यात यासंदर्भातील सुधारणेमध्ये भारतीय रेल्वेने जपानमधील बुलेट ट्रेन्सचा आदर्श घेतला आहे. जपानमधील बुलेट ट्रेन केवळ 7 मिनिटांमध्ये स्वच्छ केल्या जातात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, रेल्वेच्या सफसफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांची संख्या न वाढवता आहे त्या मनुष्यबळामध्ये कर्मचाऱ्यांची दक्षता, कौशल्य आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारण्यात करुन हे साध्य केलं आहे, असं म्हटलंय.
यात्रीगण कृपया ध्यान दें!#SwachhataHiSeva pic.twitter.com/5k9CSk7oPR
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 1, 2023
भारतीय रेल्वेचं हे नवीन धोरण रेल्वेनं सुरु केलेल्या 'स्वच्छता ही सेवा मोहीम' या स्वच्छता मोहिमेशी साधर्म्य साधणारी आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (आधीचं ट्वीटर) अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहेत.
वेगाने सफसफाई करण्याची ही यंत्रणा हळूहळू सर्वच ट्रेन्समध्ये लागू केली जाईल असं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे. "वंदे भारत ट्रेन्सपासून ही मोहीम सुरु करुन आपण हळू हळू ही यंत्रणा इतर ट्रेन्समध्येही लागू करणार आहोत. यामुळे ट्रेन्स वेळेत धावण्यासाठी मदत होईल," असं रेल्वेमंत्री म्हणाले.