मुंबई : देशातील बहुतेक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वच लोकांना परवडणारा आहे. तसेच आपल्या काहीही अडचणींशिवाय एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचता येते. एवढेच काय तर रेल्वे आपल्याला कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहोचवते. ज्यामुळे बहुतांश लोक रेल्वे ने प्रवास करतात. तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात, ज्यांना रेल्वेने प्रवास करायला आवडतं, तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित प्रत्येक नियम माहित असणे आवश्यक आहे.
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून विविध नियम केले जातात. गेल्या काही दिवसांतही रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले होते. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने रेल्वेचे नियम पाळले, तर सर्वांचाच प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो.
चला तर मग थ्री टायर कोचमधून प्रवास करण्याचे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या.
थ्री टायर डब्यातून प्रवास करताना सर्वात मोठी समस्या मधल्या बर्थची असते. अनेकदा खालच्या बर्थचा प्रवासी रात्री उशिरापर्यंत सीटवर बसून राहतो, त्यामुळे मधल्या बर्थवरील प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. याशिवाय असे देखील घडते की, मधल्या बर्थचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत लोअर बर्थवर बसतात, त्यामुळे खालच्या बर्थ वाल्याला झोपायला त्रास होतो.
अशापरिस्थीती आम्ही तुम्हाला यासंबंधीचे काही नियम सांगणार आहोत.
तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल, तर तुम्हाला रेल्वेचे नियम माहीत असावे. रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मधला बर्थ उघडू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे लोअर बर्थ असेल तर रात्री 10 नंतर मिडल बर्थ किंवा वरच्या बर्थचा प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही.
तुम्ही त्याला रेल्वेच्या नियमांचा संदर्भ देऊन त्याच्या सीटवर जाण्यास सांगू शकता. याशिवाय, मधला बर्थ असलेल्या प्रवाशाने दिवसा त्याची सीट उघडली तरी, तुम्ही हा रेल्वे नियम सांगून त्याला नकार देऊ शकता.
बऱ्याचदा असं होतं की, ट्रेनमध्ये सगळेच लोक झोपल्यानंतर ते टीटी तिकीट तपासण्यासाठी जागे होतात, अशी प्रवाशांची अनेकदा तक्रार असते. अशा परिस्थितीत त्यांची झोप भंग होते आणि त्रास होतो.
प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत टीटी प्रवाशांच्या झोपेच्या वेळी तिकीट तपासू शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल तर हा रेल्वे नियम लागू होत नाही.
रात्रीच्या वेळी सहप्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडीओ पाहणे अशा तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे बोर्डाकडे येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेने रात्री 10 वाजल्यानंतर इअर फोनशिवाय गाणी ऐकण्यास किंवा व्हिडीओ पाहण्यास बंदी घातली आहे.
नियमानुसार रात्री10 नंतर तुम्ही इअर फोनशिवाय गाणी ऐकू किंवा व्हिडिओ पाहू शकत नाही. एवढेच नाही तर रात्री मोठ्याने बोलण्यासही मनाई आहे.
जर तुमचा सहप्रवासी तुमचे ऐकत नसेल, तर तुम्ही यासाठी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू शकता. घटनास्थळी येऊन तुमची समस्या सोडवण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे. त्यानंतरही सहप्रवासी सहमत नसेल, तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते.