Semma Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरमुळं देशात मोठा तणाव निर्माण झाला होता. नोएडा येथे राहणाऱ्या सचिनसोबत पबजी गेम खेळत असताना सीमा त्याच्या प्रेमात पडली. दोघ गेम खेळता खेळता प्रेमात पडले. सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमा तिच्या चार मुलांसोबत पाकिस्तानातून भारतात आली. सीमा आणि सचिनने नेपाळमध्ये लग्न केले असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर आता चित्रपटही येत आहे. मात्र. आता सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत आहे का? अशा चर्चांना पेव फुटले आहे. तिच्या नावाचे एक तिकिटही व्हायरल होत आहे.
सीमा हैदरच्या नावाचे एक फ्लाइटचे तिकिट व्हायरल होत आहे. मुंबई ते कराची असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. हे तिकिट व्हायरल झाल्यानंतर सीमा हैदर खरंच पाकिस्तानात परतणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने ट्विटरवर हे तिकिट शेअर केले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी हे तिकिट शेअर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज केले आहे. तसंच, या चित्रपटावर तीव्र आक्षेपही घेतला आहे.
सीमा हैदर यांनी चित्रपटाचे तिकिट आणि पोस्टर शेअर करत काही कॅप्शनही दिले आहेत. #seemaHaider सारख्या देशातील गद्दरांना हिंदुस्थानात राहण्यासाठी जागा मिळणार नाही. तुमच्या हिरोइनला घेऊन पाकिस्तानात निघून जा. अमित जानी देशातील हिंदू मुस्लिम यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. पण सीमा हैदर खरंच पाकिस्तानात जात आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक निर्माता अमित जानी सीमा हैदरच्या आयुष्यावर एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांनी आधी सीमाचा पहिला पती गुलाम हैदर यालाही भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. चित्रपटाचे नाव कराची टू नोएडा असं ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी त्यांनी अनेक जणांच्या ऑडिशनही घेतल्या आहेत. तर, त्यांनी सीमाचा पती गुलाम हैदरलाही दिल्लीहून मुंबईला येण्यास सांगितलं आहे.
अमित जानी एक व्हिडिओ पोस्ट करत चित्रपटाविषयी म्हटलं आहे. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर यांच्याशी भेटून बोलायचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मला सीमाविषयी अधिक माहिती गोळा करायची आहे. गुलाम स्वतः भारतात येऊ शकत नाही तर माझा लेखक भारतातून सौदी अरेबियात जाईल, असं अमित जानी यांनी म्हटलं आहे. सीमा हैदर प्रकरणात त्यांचे मत आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असंही अमित यांनी म्हटलं आहे.