नवी दिल्ली: गेल्या काही तासांपासून मध्य प्रदेशात सुरु असलेले हे राजकारण आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. काहीवेळापूर्वीच ज्योतिरादित्य सिंधिया भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्ये जाणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
Delhi: Union Home Minister Amit Shah arrives at Prime Minister Narendra Modi's residence pic.twitter.com/K6fKae9sPC
— ANI (@ANI) March 10, 2020
ज्योतिरादित्य सिंधिया हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते. मात्र, त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि इतर काँग्रेस नेत्यांची भेट घेणे टाळले होते. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. ही शक्यता आता खरी ठरताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया भाजप मुख्यालयात जातील. याठिकाणी त्यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या गटाचे आमदार घेऊन भाजपसोबत गेल्यास मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडेल. भाजपकडून सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन केंद्रात पाठवले जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रात त्यांना मंत्रिपद देऊन राष्ट्रीय राजकारणात त्यांचा वापर केला जाऊ शकतो.
दरम्यान, मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या सध्याच्या मंत्रिमंडळात २८ मंत्री होते. त्यापैकी २० जणांनी काल राजीनामे दिले. तर उर्वरित आठ मंत्री हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात. तसेच सिंधिया गटाचे १७ आमदार बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधिया गटाचे आमदार ई-मेल करू आपले राजीनामे पाठवतील, असे सांगितले जाते. हे राजीनामे न स्वीकारले गेल्यास सर्व आमदार भोपाळला जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवतील.