कमलेश तिवारी हत्या : मुख्यमंत्री योगी घेणार पीडित परिवाराची भेट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. 

Updated: Oct 20, 2019, 08:24 AM IST
कमलेश तिवारी हत्या : मुख्यमंत्री योगी घेणार पीडित परिवाराची भेट  title=

लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्यावर धारदार आणि टोकदार हत्यारांनी तब्बल १३ सपासप वार तसेच गोळी झाडण्यात आली. या हत्येप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कमलेश तिवारी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. कमलेश तिवारी यांच्या नातेवाईकांची ५ कालिदास मार्गावरील निवासस्थानी ही भेट होणार आहे. यावळे हिंदु महासभेचे कार्यकर्ते देखील सोबत असतील. 

मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून सातही जणांची कसून चौकशी करण्यात आली. सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. सूरतमध्ये ही कारवाई करण्यात आली असून आता लखनऊ पोलीस चौकशीसाठी सुरतमध्ये येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी, तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, रशीद पठाण हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, कमलेश तिवारी हत्याकांडात शनिवारी सायंकाळी शवविच्छेदन अहवालही समोर आलाय.

शवविच्छेदन अहवालानुसार, मारेकऱ्यांनी कमलेश तिवारीकमलेश तिवारी याच्या उजव्या बाजुला २, डाव्या बाजुला ८ तर मागच्या बाजुनं ३ वेळा चाकूचे वार करण्यात आलेत. तर कमलेशच्या जबड्यात गोळी मारण्यात आलीय. कमलेश तिवारी याचा मोबाईल क्रमांक आणि घराचा पत्ता सोशल मीडियावर सहजच उपलब्ध होता, असंही पोलीस तपासात समोर आलंय. याचमुळे मारेकरी त्याच्यापर्यंत सहज पोहचू शकले. पोलिसांनी कमलेशच्या मोबाईलची कॉल डिटेल्सही खंगाळून काढलीय.

कमलेशला ज्या व्यक्तीनं शेवटचा कॉल केला ती व्यक्ती सध्या फरार आहे. पोलिसांच्या दृष्टीने हाच आरोपी आहे. कथित रुपात तो एका महिलेसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. ही महिला लखनऊच्या मडियावमध्ये राहणारी शहनाज बानो आहे. शहनाजच्या म्हणण्यानुसार, 'मारेकऱ्यांनी तिला कमलेशचा पत्ता विचारला होता. त्यावर आपल्याला माहित नसल्याचं तिनं सांगितलं होतं... पोलिसांकडून अद्याप या महिलेची चौकशी सुरू आहे.