पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे.
बिहारची राजधानी पटनातील ऐतिहासिक गांधी मैदानात ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. लालूंच्या या रॅलीकडे शक्ती प्रदर्शन, राजकीय हाक आणि राजकारणातील बेरीज-वजाबाकी अशा अनेक दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. लालूंच्या या रॅलीसाठी पक्षाने जोरदार तयारी केली असून, सर्वत्र बॅनर आणि फलक झळकत आहेत. शहरात लागलेल्या जवळपास सर्वच पोस्टरवर लालू आणि पूत्र तेजस्वी यांची छायाचित्रे झळकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेले तेजस्वी यादव स्वत: रॅलीच्या तयारिमध्ये बारिक लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान, लालूंनी भाजपचे आव्हान स्विकारत पाटन्यातील गांधी मैदानात रॅलीचे आयोजन केले असले तरी, विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते या रॅलीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते. यात सोनिया गांधी, राहूल गांधी, मायावती अशा नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे लालूंची रॅली ही एकाकी ठरण्याची चिन्हे आहेत.