रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्जासोबतच पक्षाच्या उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू झालेत. महागठबंधनचे उमेदवार आझम खान यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजप उमेदवार जयाप्रदा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर एकेकाळच्या अभिनेत्री आणि सध्याच्या भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी एका जाहीर सभेत भाषणही केलं. यावेळी, जुन्या आठवणींनी त्यांना भावूक केलं... इतकंच नाही तर त्यांना आपले अश्रूही आवरणं कठीण झालं... आणि पुढचा काही वेळ त्यांना बोलताही आलं नाही.
'मला रामपूर सोडायचं नव्हतं. कारण इथं चांगलं काम करणाऱ्या गरीब लोकांना दाबलं जातं' असं यावेळी भाजप उमेद्वार जयाप्रदा यांनी म्हटलंय. आझम खान यांच्यावर निशाणा साधत त्यांनी जे लोक त्यांच्याविरुद्ध काम करत होते त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं... मी सक्रीय राजकारणापासून आणि रामपूर सोडून गेले कारण माझ्यावर ऍसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं... माझ्यावर हल्लाही करण्यात आला' असं म्हणत असतानाच त्यांना आपलं रडू आवरता आलं नाही.
#WATCH: BJP candidate for #LokSabhaElections2019 from Rampur, Jaya Prada, breaks down while addressing a public rally; says, "Mai Rampur nahi chhodna chahti thi...Mai Rampur isliye chhod gayi, kyonki mujhe us din tezab se attack karne ke liye socha tha, mere upar hamla kiya tha" pic.twitter.com/HaWRRlHjq1
— ANI UP (@ANINewsUP) April 3, 2019
उल्लेखनीय म्हणजे, १९९४ मध्ये एन टी रामाराम यांच्या तेलगुदेशम पार्टीसोबत जयाप्रदा यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. आंध्रप्रदेशमधून त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या. उत्तर प्रदेशाच्या सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचा हात धरला. २००४ आणि २००९ साली समाजवादी पक्षाच्याच तिकीटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. २०११ साली त्या अमर सिंह यांच्या 'राष्ट्रीय लोकमंच' या पक्षात सहभागी झाल्या. २०१४ साली आरएलडीच्या त्यांनी तिकीटावर त्या बिजनौरमधून निवडणूक लढली. परंतु, यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता भाजपा हा त्यांचा पाचवा पक्ष ठरलाय... आणि सध्या त्या आझम खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून थेट आव्हान देत आहेत.
आझम खान हे यंदा महागठबंधनाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. या महागठबंधनात उत्तरप्रदेशातील एकूण ८० जागांपैंकी 'राष्ट्रीय जनता दल' (RJD) २० जागांवर तर काँग्रेस ९० जागांवर लढत आहे. याशिवाय उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष 'राष्ट्रीय लोक समता पक्ष' (RLSP) ५, जीतनराम मांझी यांच्या 'हम' पक्षाला ३ आणि सन ऑफ मल्लाह मुकेश सहनी यांच्या 'विकाशील इन्सान पार्टी' (VIP) ला ३ जागा देण्यात आल्यात. तसंच राजदच्या कोट्यातून एका जागा सीपीआय मालेला (CPI ML) देण्यात आलीय.