श्रीराम तुम्हाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही; फारुख अब्दुल्लांचा भाजपला टोला

२०१९ च्या निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू, असे भाजपला वाटते. 

Updated: Nov 1, 2018, 04:46 PM IST
श्रीराम तुम्हाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही; फारुख अब्दुल्लांचा भाजपला टोला title=

श्रीनगर: अयोध्येतील राम मंदिरावरून सुरु असणाऱ्या वादात आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी उडी घेतली आहे. २०१९ च्या निवडणुकीत राम तुम्हाला मतदान करायला येणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 

अब्दुल्ला यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, २०१९ च्या निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू, असे भाजपला वाटते. मात्र, देव त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करणार नाही. कारण, निवडणुकीत जनता मतदान करणार आहे, देव किंवा अल्लाह नवे, अशी उपरोधिक टीका अब्दुल्ला यांनी केली. 

राम मंदिर-बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.  मोठ्या प्रतिक्षेनंतर रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपला या निकालाचा फायदा होऊ शकतो. मात्र, खटल्याची सुनावणी लांबणीवर पडल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे.