Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा केली जाईल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यापासून उज्वला योजनेचा लाभ पोहोचवण्यापर्यंत अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वयंपाक घरातील गॅसपासून शेतकऱ्यांना सरकार मोठा दिलासा देऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता आहे? याबद्दल जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ही घोषणा झाली तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. आज होत असलेल्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीआधी सरकार मोठी वोटबॅंक मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. सरकार निवडणुकीआधी उज्वला योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी एक वर्षासाठी वाढवू शकते. सरकार या स्किम अंतर्गत मिळणारी सब्सिडी 31 मार्च 2025 पर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास 9 कोटीहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे. ही योजना आणखी 1 वर्षांनी वाढवल्यास सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर देशातील 9 कोटींहून जास्त परिवाराच्या गॅस सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळू शकेल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात मे 2016 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना एलपीजी कनेक्शन मिळते. उज्वला योजनेअंतर्गत सरकार लाभार्थींना गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सवलत देते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 12 सिलेंडर मिळतात. उज्वला योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये 603 रुपयांना सिलेंडर मिळतो. तर इतरांना 903 रुपयांना सिलेंडर मिळतो. सरकारकडून आधी 200 रुपयांची सब्सिडी मिळायची. पण मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही सब्सिडी वाढवून 300 रुपये करण्यात आली.
केंद्र सरकार देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याआधी सरकार एमएसपीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. किमान आधारभूत किमतीत 285 रुपये प्रति क्विंटलने वाढ केली जाऊ शकते. सरकारच्या निर्णयानंतर ज्यूटचा एमएसपी 5335 रुपये होईल. सध्या तागाचा एमएसपी 5050 रुपये प्रति क्विंटल आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भाजपकडे मोठी व्होट बँक आकर्षित होऊ शकते.