नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय.
सरकारनं केवायसी नियमांत बदल केलेत. या नव्या नियमांनुसार, ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंत दागिने खरेदीवर पॅन क्रमांक द्यावा लागणार नाही. आत्तापर्यंत ही मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत होती. त्यामुळे तुम्ही आता २ लाख रुपयांपर्यंत दागिने खरेदी केलेत तर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक देणं गरजेचं नसेल.
याशिवाय मोदी सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना काही अटींसहीत रिटर्न फाईल करण्यात सूट दिलीय. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील जवळपास ५ करोड छोट्या व्यापाऱ्यांना होऊ शकेल. नव्या नियमानुसार, वार्षिक १.३ करोडचा टर्नओव्हर करणाऱ्या व्यापाऱ्यांना महिन्याऐवजी तीन महिन्यांनी रिटर्न फाईल करण्याची सूट मिळणार आहे. तसंच निर्यातकांनाही मार्च २०१८ पर्यंत जीएसटीमध्ये सूट देण्यात आलीय.
सणासुदीचे दिवस असतानाही गेल्या काही दिवसांपासून सराफा व्यापार मंदावला होता... ग्राहक सराफा दुकानांत फिरकेनासे झाले होते... त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांची चिंता वाढली होती. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे निश्चितच त्यांना दिलासा मिळणार आहे.