पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील 'जोजिला' खिंडीचं भूमीपूजन

 जोजिला भुयाराच्या निर्मितीसाठी भारतीय सैन्यानं १९९७ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. मात्र, या दिशेने ठोस पाऊल १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आलं.

Updated: May 19, 2018, 07:29 PM IST
पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील 'जोजिला' खिंडीचं भूमीपूजन  title=

काश्मीर : पंतप्रधान मोदी काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काश्मीर खोरं आणि लडाखला वर्षभर जोडणाऱ्या जोजिला भुयारी प्रकल्पाचं भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.  खराब हवामानामुळे लडाखचा काश्मीर खोऱ्याशी अनेकदा संपर्क तुटतो... मात्र हे भुयार तयार झाल्यावर ही समस्या दूर होणार आहे. याचबरोबर सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनदेखील जोजिला खिंड महत्त्वाची आहे. या भुयारातून साडे तीन तासांचा प्रवास केवळ काही मिनिटांत पूर्ण होईल. ६ हजार ८०९ कोटी रुपये खर्च येणाऱ्या या प्रकल्पात १४ पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचं भुयार निर्माण केलं जाणार आहे. 

२०२६ पर्यंत या भुयाराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोजिला भुयाराच्या निर्मितीसाठी भारतीय सैन्यानं १९९७ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. मात्र, या दिशेने ठोस पाऊल १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आलं. १४.२ किलोमीटर लांबीच्या या भुयारात दुपदरी मार्ग निर्माण केला जाईल. 

याशिवाय वैष्णोदेवी भक्तांसाठी तयार करण्यात आलेल्या सात किमीच्या रोप वेचंही पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. या मार्गामुळे भक्तांसाठी वैष्णो देवीचं दर्शन घेणं आणखी सुलभ होणार आहे.