केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका आरोग्य कर्मचारी उपस्थित करत आहेत. एका खासगी रुग्णालयात हे दोन्ही मृत्यू झाले आहेत. मृत झालेल्या दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाला आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. बुधवारपर्यंत त्याचे रिपोर्ट येतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधीही कोझिकोड येथे निपाहची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आणि निपाह व्हायरसची शंका उपस्थित होऊ लागल्यानंतर आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
केरळच्या कोझिकोडमध्ये 2018 रोजी निपाह व्हायरसचा रुग्ण आढळला होता. या व्हायरसमुळे 17 जणांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका नर्सचाही समावेश होता. 2019 मध्ये, एर्नाकुलममध्ये एक रुग्ण आढळला होता. दरम्यान, तिथे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. सप्टेंबर 2021 मध्ये, निपाहने जिल्ह्यात पुन्हा एकदा 12 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला होता.
निपाह हा एक असा व्हायरस आहे, जो जनावरांच्या माध्यमातून माणसांमध्ये फैलावतो. 1999 रोजी मलेशियात सर्वात पहिलं प्रकरण आढललं होतं. यानंतर सिंगापूर आणि बांगलादेशात रुग्ण आढळले होते. हा विषाणू वटवाघुळ आणि डुकरांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो.
या व्हायरसची लागण झालेल्या वटवाघूळ किंवा डुकराने कोणतेही फळ खाल्ल्यास निपाह विषाणू त्या फळाद्वारे माणसांमध्ये पसरू शकतो. निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याची लागण झाल्याची शक्यता असते. त्यामुळे निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना सावधगिरी बाळगावी लागते. हा विषाणू इतका धोकादायक आहे की तो एखाद्याचा जीवही घेऊ शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते.
निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं.
जर तुम्हालाही आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची शंका असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. याशिवाय पीसीआर, सीरम न्यूट्रिलाइजेशन आणि एलाइज़ा टेस्टच्या माध्यमातून व्हायरसची माहिती घेऊ शकता.