JEE Main Admit Card 2023: देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे मुख्य परीक्षा (JEE Main) घेतली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेचे सिटी स्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर याचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हे हॉल तिकीट डाऊनलोड करु शकतात.
या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन हॉल तिकीट डाऊनलोड करु शकतात. परीक्षेआधी हॉल तिकीट डाऊनलोड करुन यात काही चुका असल्यास विद्यार्थी या चुका दुरुस्त करुन शकतात. जेणेकरुन ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ होणार नाही.
जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. परीक्षा 1 फेब्रुवारीला संपणार आहे. 24, 25, 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी रोजी दोन सत्रामध्ये एक पेपर घेण्यात येणार आहे. तर, 28 जानेवारी दुसऱ्या सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात परीक्षेची तारीख 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी निश्चित करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार 27 आणि 28 जानेवारीला परीक्षा होणार नाही.
जेईई मेन 2023 च्या पेपर पॅटर्नमध्ये एकाधिक निवड प्रश्न (MCQ) आणि संख्यात्मक अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत. पेपर 1 - जेईई मेनच्या बीई, बीटेक पेपरमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीन विभागांचा समावेश असेल. या विषयांचे 90 प्रश्न असणार आहेत. तर, पेपर 2A- BArc पेपरमध्ये गणित, अभियोग्यता चाचणी आणि रेखाचित्र असे तीन विभाग असतील, त्यात 82 प्रश्न असतील. तर जेईई मेन परीक्षेच्या पेपर 2B- B-प्लॅनिंग पेपरमध्ये गणित, अभियोग्यता चाचणी आणि नियोजनावर आधारित 105 प्रश्न असतील.