नवी दिल्ली : भारतीय पायलट अभिनंदन याची सुटका करण्यासाठी पाकिस्तान ब्लॅकमेलिंगच्या पायरीवर उतरला आहे. अभिनंदनच्या सुटकेसाठी आम्ही तयार आहोत पण भारताने चर्चेसाठी पुढे यायला हवे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान अभिनंदनची सुटका सशर्थ करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय पायलट सुरक्षित आहे आणि त्याची सुटका होऊ शकते, यासाठी पाकिस्तान सकारात्मक पाऊल टाकण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. अशा कृत्यातुन पाकिस्तान हताश झालाय हे सिद्ध होत आहे. अभिनंदन प्रकरणावरून पाकिस्तान भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय.
भारताचा पायलट सुरक्षित आणि आम्ही त्याच्या सुटकेबाबत विचार करू. पाकिस्तान मागच्या वेळेप्रमाणेच सकारात्मक पाऊल उचलण्यास तयार आहे, असे कुरेशी म्हणाले. मला भारतातील लोकांना सांगायचे आहे की, पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागला.पाकिस्तानी 16 ने भारतीय वायु सीमेचे उल्लंघन करत सुरक्षा ठिकाणांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण वायु सेनेच्या मुत्सदेगिरीने त्यांना माघारी पाठवण्यात आले. या दरम्यान भारतीय सेनेने पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ 16 पाडले.
अभिनंदन हा 'प्रिजनर ऑफ वॉर' आहे. जिनिव्हा कायद्यानुसार त्याला पीओडब्ल्यूच्या सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे. पण पाकिस्तानकडून जिनिव्हा कायद्याचे उल्लंघन होत आहे.पाकिस्तानमध्ये मीडिया समोर अभिनंदनची परेड करण्यात आली. एवढंच नव्हे तर भारतीयांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदनचा व्हिडीओ जारी केला आहे. अभिनंदनला कैदी बनवून ते आपला यात विजय झाल्याचे मानत आहेत.
अभिनंदनला परत पाठवण्यासाठी भारत पाकिस्तानवर दबाब टाकत आहे. अभिनंदनला तात्काळ सोडावे अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तान ठरवूनही अभिनंदनला जास्त काळ स्वत:कडे ठेवू शकत नाही. जिनिव्हा करारानुसार भारतीय पायलटला त्यांना सोडावेच लागेल. 1999 मधील कारगिल वॉरमध्ये कैद केलेल्या भारतीय पायलट नचिकेतला देखील त्यांना पाठवावे लागले. त्यामुळे अभिनंदनला पाठवण्या शिवाय पाकिस्तानकडे दुसरा पर्याय नाही.