नवी दिल्ली : रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.
प्रवाशांना तिकिट खरेदीचा हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. आधी तिकिट नंतर पैसे या योजनेसाठी 'आयआरसीटीसी'ने मुंबईतील 'ई-पेलॅटर' या कंपनीशी सहकार्य करार केला आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड ट्युरिझम कॉर्पोरेशनचे प्रवक्ते संदीप दत्ता यांनी सांगितले.
रेल्वे हा तिकिटाचा पर्याय आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लवरकरच उपलब्ध करुन देणार आहे. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल व त्यामुळे प्रवासाच्या आधी पाच दिवस तिकिट काढून त्याचे पैसे नंतर १४ दिवसांत कधीही चुकते करण्याचा पर्याय त्यास उपलब्ध होईल.
दरम्यान, हा पर्याय 'आयआर सीटीसी'च्या वेबसाइटवरून काढल्या जाणाऱ्या 'ई-तिकिटा'नाच फक्त उपलब्ध असणार आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक यांची माहिती द्यावी लागणार आहे. 'ओटीपी' (वन टाइम पासवर्ड) पाठविला जाईल आणि त्यानंतर पुढील सेवा घेता येईल.