Viral Video : तुम्हाला थ्री इडियट्स चित्रपटातील तो सीन तर नक्कीच लक्षात असेल ज्यामध्ये रॅंचो त्याचा मित्र राजूच्या वडिलांना स्कूटीवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जातो आणि थेट डॉक्टरांच्या पुढ्यात नेऊन उभे करतो. असाच काहीसा प्रकार राजस्थानात (Rajasthan) पाहायला मिळाला आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका व्यक्तीने आपली स्कूटी थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर नेली आहे. मुलाला चालता येत नसल्याने वकिल बापाने स्कूटी थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नेली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी (Rajasthan Police) हे प्रकरण शांत केले.
राजस्थानातील कोटाचे एमबीएस हॉस्पिटल पुन्हा चर्चेत आले आहे. एक वकील आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी स्कूटी घेऊन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्याचवेळी एमबीएस रुग्णालयाचा गलथान कारभारही समोर आला. व्हीलचेअर नसल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे वकिलाचे म्हणणे आहे. यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि वकील यांच्यात जोरदार वादावादी झाली. एमडीएम हॉस्पिटलचे वॉर्ड इन्चार्ज आणि वकील मनोज जैन यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले, त्यानंतर नयापुरा पोलीस ठाण्याने हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.
गुरुवारी रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण आपापल्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी दुपारी दीडच्या सुमारास अचानक मनोज जैन हे स्कूटी घेऊन लिफ्टकडे जाऊ लागला. त्यांच्या मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे ते सांगत होते. त्यांनी स्कूटी लिफ्टमध्ये घातली आणि नंतर मुलाला वॉर्डच्या दिशेने घेऊन निघाले. मुलाला स्कूटीवरून वॉर्डात पाहून सगळेच थक्क झाले. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी होऊन गदारोळ झाला.
वकिलाने काय सांगितलं?
The way people are not surprised or shock it seems this is regular affair at Government hospital in Kota, Rajasthan pic.twitter.com/YI3JG6HQqD
— नंदिता ठाकुर (@nanditathhakur) June 17, 2023
"काल माझ्या मुलाच्या पाया दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. मग मी प्लास्टर करण्यासाठी एमबीएस हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत पोहोचलो, तिथे डॉक्टरांनी चेकअप करून मुलाच्या पायाला प्लास्टर केले. त्यानंतर खाली येण्यासाठी व्हील चेअर शोधू लागलो तेव्हा मला तिथे काहीच दिसले नाही. जेव्हा मला व्हील चेअर मिळाली नाही तेव्हा मी कर्मचाऱ्यांना विचारले की, माझ्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी आहे, ती आणू का? त्यावर कर्मचाऱ्यांनी सांगितले की आणता येत असेल तर घेऊन या. यानंतर मी स्कूटी घेऊन लिफ्टने वॉर्डात आलो. मात्र, कर्मचाऱ्यांनी माझी स्कूटी थांबवून त्याची चावी काढली. त्यांनी माझ्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी येथे येऊन सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले," असे वकील मनोज जैन यांनी सांगितले.
पोलिसांनीही वकिलाला ठरवले योग्य
पोलिसांनी स्कूटर तिसऱ्या मजल्यावर नेणे योग्य म्हटलं आहे. "तुम्ही जे केले ते योग्यच आहे. हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव असेल, तर त्यांच्या पेशंटसाठी कोणीही देवाची वाट पाहणार नाही. जे काही साधन असेल ते ते वापरतील. व्हीलचेअर नसल्याने आणि हॉस्पिटलमध्ये प्लास्टर केल्याने वडिलांना आपल्या मुलाला स्कूटरवरून वर न्यावे लागले," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.