मुंबई : आज १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'. अर्थात प्रेमाचा दिवस. जगभरात मोठ्या उत्साहात प्रेम करणाऱ्या व्यक्ती हा दिवस साजरा करतात. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी 'व्हॅलेंटाइन डे' खास मानला जातो. १४ फेब्रुवारी हा दिवस केवळ 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो असं नाही तर हा दिवस इतिहासात प्रेमाचे प्रतिक म्हणूनही नोंदवला गेला असून यादिवसाला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
रोममध्ये तीसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अनेक बंधनं लादली, त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. क्लॉडियस राजाचं असं मत होतं की, अविवाहित पुरूष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती.
संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते. त्यांनी प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला. पण राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे राजाने त्यांना १४ फेब्रुवारीच्याच दिवशी फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासून आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.
गेल्या अनेक वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया आणि संपर्क करण्याच्या माध्यमांमध्ये वाढ झाल्याने या दिवसाच्या लोकप्रियतेतही वाढ झाली असून जगभरात हा दिवस साजरा करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. परंतु भारतात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यावरून काही वर्गांतून विरोधाचा आवाजही उठवण्यात आला होता. पण या सगळ्याला झिडकारून प्रेमीयुगल, प्रेम व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यादिवशी फूल, चॉकलेट आणि गिफ्ट्स देऊन आपलं प्रेम मात्र व्यक्त करतातच.