तिरुअनंतपुरम - शबरीमला मंदिरात दोन महिलांना केलेल्या प्रवेशानंतर केरळमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राज्यपालांकडे अहवाल सादर केला. यामध्ये आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याचवेळी आतापर्यंत पकडलेल्या एकूण १००२४ आरोपींपैकी ९१९३ आरोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या विविध संघटनांशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. केरळचे राज्यपाल पी सथाशिवम यांनी या प्रकरणी तातडीने एक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा अहवाल सादर करण्यात आला.
शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर संपूर्ण केरळमध्ये हिंसाचार उसळला. भाजप आणि इतर हिंदूत्त्ववादी संघटनांनी १२ तासांचा राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था काहीशी कोलमडली. या पार्श्वभूमीवर तातडीने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.
राज्यातील हिंसाचाराचे स्वरुप काय होते आणि तो आटोक्यात आणण्यासाठी कोणते उपाय योजले गेले, याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. हिंसाचारात ज्यांचा समावेश होता, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. ते कोणत्या पक्षाचे आहे किंवा कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, याचा विचार केला जाणार नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. राजभवनकडून या अहवालातील माहितीवर आधारित निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून राज्यात जातीय विद्वेष पसरविण्याची योजना होती. त्याचे काही फोटो आणि सीडीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जेव्हा शबरीमला मंदिर प्रवेशासाठी खुले करण्यात आले. त्यावेळी एकूण ३० महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी ५ महिला पत्रकार होत्या. पण त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे यावेळी पहिल्यांदा उल्लंघन झाले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत १७ माध्यमकर्मी जखमी झाले. तर एकूण २५ जणांना अटक करण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी हिंसाचार सुरू झाला. कन्नूर जिल्ह्यातील हिंसाचाराची तीव्रता जास्त होती. भाजप आणि संघ परिवार त्याचबरोबर सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्याही काही जणांचा यात समावेश होता, असे अहवालात म्हटले आहे.