Jyoti-Alok Maurya Case Update: पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या (Jyoti Maurya) सध्या पती अलोक मोर्याने (Alok Maurya) केलेल्या आरोपांमुळं चर्चेत आली आहे. या प्रकरणात आता एक मोठी घडामोड घडली आहे. ज्योतीचे होमगार्ड कमांडेंट मनीष दुबेसोबत (Manish Dubey) विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. यानंतर दोघांची चौकशी सुरू होती. आता चौकशीला अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. यानंतर डीजी होमगार्ड यांनी कामांडेंट मनीष दुबे यांना निलंबीत करुन तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता मनिष दुबे आणि ज्योतीचे कॉल रेकॉर्डिंगदेखील समोर येत आहे.
प्रयागराज येथे राहणारे अलोक मौर्या हे एक चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. तर त्यांची पत्नी ज्योती मौर्या ही सरकारी अधिकारी आहे. अधिकारी झाल्यानंतर ज्योती आणि अलोकच्या नात्यात कटुता आली. तसंच, तिचं होमगार्ड मनीष दुबेसोबत अनैकित संबंध आहेत, अशा आरोप त्याने केला आहे. याबाबत आलोकने होमगार्ड मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. यात होमगार्ड मनिष दुबेवर गंभीर आरोप केले आहेत.
अलोकच्या तक्रारीनुसार, ज्योती आणि मनिष यांच्या अफेअरनंतर ज्योतीने त्याच्याविरोधात खोटी हुंडाबळीची तक्रार दाखल केली. त्याने काही पुरावेही सादर केले आहेत. त्यात काही व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगदेखील आहेत. यातील एका रेकॉर्डिंगमध्ये ज्योती आणि मनीष यांच्यातील संभाषण आहे.
ज्योती आणि मनीष बोलत असताना अलोकला आपल्या मार्गातून दूर करणे, त्याचा किस्सा संपवणे असे शब्द बोलताना समोर आले आहे. यावरुनच ते आपल्या जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप आलोकने केला आहे. मात्र, मनीष दुबेने हे आरोप फेटाळले आहेत. झी 24 तास या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.
वरिष्ठांनी जेव्हा मनीषची याबाबत चौकशी केली तेव्हा ते अलोकला घटस्फोट देण्याबाबत बोलत होते, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर मनीषचा मोबाइल फोन, सीडीआरसारखी गोष्टीची पडताळणी केली जाईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, डीजीआय यांच्या चौकशीदरम्यान मनीष दुबेबाबत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मनीष दुबे यांच्या कृत्यामुळं विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. तसंच, त्याने संपर्कात आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसंच, अमरोही इथे तैनात असलेल्या एका महिला होमगार्डने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्याला विरोध केल्यानंतर मनीषने तिला नौकरीवरुन काढून टाकले होते.