मुंबई : दिल्ली निवडणूक निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. आम आदमी पक्षाने इथे पुन्हा एकदा मुसंडी मारली असून भाजप झपाट्याने मागे जातानाचे सध्याचे चित्र आहे. निवडणूक निकालांचा सर्व्हे देखील अशाप्रकारचा निकाल सांगत होता. पण हे सर्व्हे खोटे ठरतील असा विश्वास दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी व्यक्त केला होता. दरम्यान देशभरातील भाजप विरोधी पक्षांतून या निकालावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रात काडीमोड करुन भाजपला धक्का देणाऱ्या शिवसेनेनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अहंकार लोक उतरवतात, राज्याप्रमाणे देशालाही पर्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
भाजपचे प्रमुख केंद्र दिल्लीत असतानाही त्यांचा पराभव आपने केलाय. दिल्लीकरांनी भाजपला नाकारल्याचे ते म्हणाले. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळं देशातही ते घडतंय. दिग्गज नेते उतरवूनही पराभव झाला, यातच पुढील भविष्याची दिशा दिसतंय. दिल्लीत बसणाऱ्या लोकांनाच नाकारले गेल्याचे परब म्हणाले.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्लीतील जनतेने भाजपला देशद्रोही घोषित केल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपचा अहंकार जनतेने नाकारत विकास आणि विश्वासाला मत देत आप पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचं मतं नवाब मलिकांनी व्यक्त केलंय. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होवून विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले.