नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला. नवी दिल्लीमधल्या रामलीला मैदानावर ही घटना घडली. अण्णा हजारे यांचं उपोषण सुरु होतं. तिथे मुख्यमंत्री भाषण करत असताना, उपस्थित गर्दीतून एक बूट मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं भिरकावला गेला. मात्र तो बूट बाजूला जाऊन पडला.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर जाऊन अण्णांचं उपोषण सोडवलं. मात्र अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं ठोस निर्णय न जुजबी आश्वासन देऊन अण्णांनी बोळवण करण्यात आल्याचं दिसतंय. कृषी उपकरणांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याची घोषणा केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी रामलीला मैदानावर केली.
मात्र, याबाबत जीएसटी बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीबद्दल कालबद्ध कार्यक्रम न देता मोघमपणे लवकरच अंमलबजावणी करणार असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. मात्र मागण्यांवर लवकर अंमलबजावणी झाली नाही, तर सप्टेंबरमध्ये पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला. तर अण्णांना पुन्हा आंदोलन करावं लागणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.