Sikkim Floods : सिक्कीममध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं मोठं संकट ओढावलं आहे. इथं उत्तराखंड आणि हिमाचल प्रांत पूराच्या माऱ्यातून सावरत असतानाच तिथं सिक्कीममध्ये आता नैसर्गित आपत्तीमुळं अनेक संकटं ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर सिक्कीमस्थित ल्होनक तलावापाशी अचानकच ढगफुटी झाल्यामुळं तिथून वाहणाऱ्या नदीची पाणीपातळी अनपेक्षितरित्या झपाट्यानं वाढली आणि आजुबाजूचा परिसर जलमय झाला.
लष्कराच्या अनेक तुकड्या इथं विविध तळांवर तैनात असल्यामुळं त्यांच्यावरही या पूराचा प्रभाव पडल्याचं सांगण्यात येत असून, जवळपास 23 जवान बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या या जवानांना शोधण्यासाठी लष्करानं मोहिम हाती घेतली असून, आपत्तीतही ही मोहिम सुरु आहे.
पूरानंतर चुंगथांग बांध येथून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळं सखल भागांमध्य असणाऱ्या गावांमध्ये अतिशय वेगानं पाण्याचा शिरकाव झाला. पाहता पाहता ही पाणीपातळी 15 ते 20 फुटांवर पोहोचली. ज्यामुळं सिंगतम येथील बारदांगमध्ये असणाऱ्या लष्करी तळावर असणारी वाहनांना जलसमाधी मिळाली. तर, 23 जवानांचा कुठंही थांगपत्ता लागला नाही.
#WATCH | Sikkim: A flood-like situation arose in Singtam after a cloud burst.
(Video source: Central Water Commission) pic.twitter.com/00xJ0QX3ye
— ANI (@ANI) October 4, 2023
सिक्कीममधील तीस्ता नदीची पाणीपातळी वाढल्यामुळं सिंगथम येथे असणारा पादचारी पूल वाहून गेला. तर, जलपाईगुडीतही पूराचा प्रभाव दिसल्यामुशळं इथं सखल भागांमधील नागरी वस्तीला स्थलांतरीत करण्यातआलं. सध्या स्थानिक प्रशासनानं इथं नागरिकांसह यंत्रणांनाही अतिदक्षतेचा इशारा दिला असून, नदीच्या किनारपट्टी भागात कोणालाही न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
सिक्कीममधील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (SSDMA) नागरिकांना या आपत्तीसंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मंगल जिल्ह्यामध्ये असणाऱ्या उत्तरी क्षेत्रात ढगफुटीमुळं पूराचं संकट ओढावल्याचं स्पष्ट करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळं आदर्शगांव, समरदुंग, मेलीसह इतर संवेदनशील भागांमध्ये जाण्यापासून नागरिकांना रोखण्यात येत आहे. तर, या भागांमध्ये अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवत त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनानं प्राधान्यस्थानी ठेवलं आहे.