नवी दिल्ली: कंदहार विमान अपहरणावेळी मसूद अजहरला सोडण्याच्या निर्णयाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा पाठिंबा होता, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. शहा यांनी ब्लॉगच्या माध्यमातून या विषयावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपवर टीका करताना मसूद अजहरच्या सुटकेचा वारंवार उल्लेख करताना दिसत आहेत. अमित शहा यांच्याकडून या टीकेचा प्रतिवाद करण्यात आला आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, कंदहार विमान अपहरणानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हजर होते. यावेळी विमानातील भारतीय प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी मसूद अजहरला सोडण्याच्या निर्णयाला सर्वपक्षीयांनी एकमताने मान्यता दिली होती, याकडे अमित शहांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी विमानातील प्रवाशांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी होती. त्यामुळे नाईलाजाने तो निर्णय घ्यावा लागला. मात्र, आता राहुल गांधी दुर्दैवाने या सगळ्याचे राजकारण करण्याच्या नादात लोकांची दिशाभूल करत आहेत, असे अमित शहांनी म्हटले.
तसेच २०१० साली यूपीए-२ सरकारने २५ कडव्या अतिरेक्यांची सुटका केली, ही बाबही पक्षाच्या नेत्यांनी सर्वांना सांगावी. शाहीद लतीफ हा त्यांच्यापैकी एक होता. पठाणकोट हल्ल्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे सांगत अमित शहांनी काँग्रेसवर प्रतिहल्ला केला. राहुल गांधी कंदहार विमान अपहरण मुद्द्यावरून राजकारण करणार असतील तर मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सय्यद हिच्या सुटकेच्या मोबदल्यात सरकारने १० दहशतवाद्यांना सोडल्याचाही उल्लेख त्यांनी करावा, असे अमित शहा यांनी सांगितले.