नवी दिल्ली : भाजपचं सरकार असलेल्या राज्यांच्या १५ मुख्यमंत्री आणि युतीमध्ये असलेल्या ७ उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत ५ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
या पाच राज्यांमधल्या २०८ जागांपैकी मागच्यावेळी भाजपनं १९२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार नव्हतं. आता या ५ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे या मुख्यमंत्र्यावर आहे, असं अमित शाह या बैठकीत म्हणाले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाच्या प्रचारावर लक्ष देण्यात यावं. योजनांचा लाभ योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावा आणि नागरिकांना सरकारच्या कामाची माहिती असावी, असं या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं. याबद्दलचं एक प्रेझेंटेशनही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आणि त्यांची यावर प्रतिक्रियाही घेण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.