नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका हे उभय देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यापारी मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे एकमत झाले असून, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी कृषी मालांची निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे.
अमेरिका सरकार आणि उद्योजकांसोबत बोलताना प्रभू यांनी उभय देशांमधील फळ निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. तसेच, अमेरिकेतील कंपन्यांनी भारताच्या मेक इन इंडिया धोरणाचा लाभ घ्यावा असेही अवाहन प्रभू यांनी केले. भारत अमेरिका यांच्यात झालेल्या आर्थिक चर्चेदरम्यान, अमेरिकेचे अर्थमंत्री विल्बर रॉस यांच्यासमोर प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
या वेळी बोलताना प्रभू म्हणाले, भारताची आपेक्षा आहे की, अमेरिकेने भारतातील फळ आयात निर्यात प्रक्रियेकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. भारतात अधिक गुणवत्तापूर्ण कृषीमाल तयार होत आहे. मात्र, काही व्यावसायीक, तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे ही आयात, निर्यात पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.
या वेळी प्रभू यांनी खास करून भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या डाळींब आणि द्राक्ष फळांच्या निर्यात प्रक्रीयेवर विशेष भरत दिला.