भोपाळ : आपली लेक आणि लेकीच्या यशासाठी वडील अथक प्रयत्न करतात. त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं यासाठी वडील जीव तोडून मेहनत करतात. अशाच एका मेहनती पित्याचं स्वप्न त्यांच्या लेकीनं पूर्ण केलं आहे. मध्य प्रदेशच्या नीमच गावातील आचल गंगवाल हिची भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग शाखेत निवड झाली आहे. आचलच्या वडिलांचा चहाविक्रीचा व्यवसाय आहे. चहाची विक्री करुन त्यांनी आपल्या लेकीला शिकवलं. लेकीच्या या गगनभरारीमुळे आचलच्या वडिलांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग शाखेसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. सहा वेळा प्रयत्न केल्यानंतर आचलची या शाखेसाठी निवड झाली आहे.
सहा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील २२ जणांची निवड झाली असून त्यापैकी आचल एक आहे. बारावीत असताना उत्तराखंडमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवले होते. त्याचवेळी हवाई दलात जाण्याचा विचार केला होता असं आचलने सांगितलं आहे.