मुंबई : देशात पुन्हा कोरोना (Coronavirus) रुग्ण वाढत (corona patient growth) असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लस (Covid vaccine) दिल्या जात आहेत. त्यातल्या कोविशिल्ड लसचा दुसरा डोस आता 28 दिवसाऐवजी 45 ते 60 दिवसांनी दिला जाणार आहे. तशा सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
कोविशिल्ड लसचा परिणामकारकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सिनच्या लसचा दुसरा डोस मात्र आधीप्रमाणे 28 दिवसानंतरच दिला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 40 हजार 715 रुग्ण वाढले आहेत. तर 199 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाचे 1 कोटी 16 लाख 86 हजार 796 रुग्ण समोर आले आहेत. तर आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 81 हजार 253 रुग्ण बरे झाले आहेत. तर आताच्या घडीला 3 लाख 45 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत 1 लाख 60 हजार 166 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह आतापर्यंत 4 कोटी 84 लाख 94 हजार 594 जाणांचे लसीकरण पूर्ण झाल आहे.
राज्यात पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रुग्णवाढ थांबली नाही तर काही शहरात लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच राज्यात कडक निर्बंध आणावे लागतील, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसात निर्णय घेऊ शकतात, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.