नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचे वाढते आकडे भयावह स्थिती तयार करीत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग गतीने पसरत आहे. तर सर्वाच तीव्र फटका महाराष्ट्राला बसला आहे. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊन सारख्या उपायांच्या अंमलबजावणी होत आहे. तरीसुद्धा कोरोनाचे आकडे दररोज रेकॉर्ड ब्रेक करत आहेत.
रविवारी देशात 1 लाख 70 हजारावर नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यात 63 हजाराहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशात एका दिवसात 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हिंदुस्तान टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट जास्त विध्वंसक आहे. आता ते जिल्हे जास्त प्रभावित होत आहेत. जे गेल्या वेळच्या लाटेत वाचले होते.
ज्या राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ते राज्य म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगाना, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल आदी होय. या राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये कोव्हिड19 चा संसर्ग दुप्पट- तिप्पट वेगाने पसरतोय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात काही दिवसांपासून वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्ण बरे होण्याच्या दर घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखापेक्षा अधिक रुग्ण दररोज देशात सापडत आहेत. देशातील एकूण ऍक्टिव केसेसमध्ये 70.82 टक्के केसेस महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळचा आहे. यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 48.57 टक्के इतका आहे.