नवी दिल्ली : भारताचे CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांचे लष्करी हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरजवळ क्रॅश झाले ज्यात 14 लोक होते. या अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. एक शूर योद्धा गेल्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भारतीय सेलिब्रिटींनी ही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी व्यक्त केला शोक
बुधवारी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पाकिस्तानचे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) लेफ्टनंट जनरल नदीम राजा आणि लष्कर प्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
इस्रायलने शोक व्यक्त केला
इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी इस्रायली संरक्षण खाते आणि भारतीय जनतेच्या वतीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि दुःखद अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त करतो.'.
कठीण काळात तैवान भारतासोबत
तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने लिहिले की, 'या दु:खद हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांप्रती आमची तीव्र संवेदना. या कठीण काळात तैवान भारतासोबत आहे.'
श्रीलंकने व्यक्त केला शोक
श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे म्हणाले, "तामिळनाडूमधील दुःखद हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, श्रीमती रावत आणि इतरांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. श्रीलंकेच्या लोकांच्या वतीने, मी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व भारतीयांना माझ्या संवेदना व्यक्त करतो.
ऑस्ट्रेलियाकडून श्रद्धांजली
ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त म्हणाले, 'हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत आणि इतरांच्या कुटुंबियांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. जनरल रावत यांच्या कार्यकाळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण संबंध प्रचंड वाढले आहेत.
रशिया म्हणाला - भारताने एक नायक गमावला
रशियन राजदूत म्हणाले, "आज हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि इतर 11 अधिका-यांच्या दुःखद निधनाबद्दल कळून खूप दुःख झाले. भारताने आपला महान देशभक्त आणि समर्पित नायक गमावला आहे.
भूतानकडून शोक
भूतानचे पंतप्रधान म्हणाले, 'भारतातील हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल जाणून खूप दुःख झाले, ज्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. मी आणि भूतानचे लोक भारत आणि त्यांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.'