Uddhav thackeray देशाचं नेतृत्व करू शकतात; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 भविष्यात जर लागली तर देशाचं नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated: Jul 27, 2021, 12:48 PM IST
Uddhav thackeray देशाचं नेतृत्व करू शकतात; संजय राऊत यांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली :  'मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की वाढदिवस साजरा करू नका, ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली पंचेचाळीस वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात देशाला देखील अपेक्षा आहेत. हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो आजच्या दिवशी, देशाला सुद्धा उद्धव ठाकरे यांचा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात जर लागली तर नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे',  असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे.

'जगभरात ज्या वेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचावकार्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे. पण महाराष्ट्रतही जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्‍यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे हल्ले करणे हे थांबले पाहिजे.

प्रत्येक जण मनापासून, महाराष्ट्र आपला आहे, सर्वांनी एकमेकांना मदत करावी आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही. हा श्रेयवाद नाही. जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत.' असेही राऊत यांनी म्हटले आहे.

'महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत, पण केंद्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देणारे राज्य आहे. विशेषतः मुंबई! आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही. पण केंद्र आमचा बाप आहे. महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे. त्यांनी काही घोषणा केलेली आहे. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटीचा चेक घेऊन यावा. जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू'. असाही टोला संजय राऊत यांनी लगावला