नवी दिल्ली : विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो मात्र आता आपण मोबाईल फोन विमानात वापरू शकाल. विमान प्रवासात भारतीय हवाई हद्दीत इंटरनेट आणि फोनचा वापर करू देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. टेलिकॉम कमिशनकडे हा प्रस्ताव प्रलंबीत होता, त्याला आता मान्यता मिळालीय. विमान प्रवासात आता मोबाईल फोन आणि इंटरनेटची सुविधा वापरता येणार आहे. मात्र हे कार्यान्वित होण्यासाठी अजून 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विमानामध्ये वाय-फाय वापरण्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागू शकतात. परदेशामध्येही अशाचप्रकारे वाय-फाय वापराचे पैसे द्यावे लागतात. परदेशामध्ये १० एमबी डेटा वापरण्यासाठी ४.५ डॉलर म्हणजेच ३०२ रुपये खर्च येतो.
भारतीय विमानांमध्ये वाय-फाय वापरायचं असेल तर ३ मिनिट ते १ तासापर्यंत ५०० रुपये ते एक हजार रुपये खर्च येऊ शकतो, असं बोललं जातंय. म्हणजेच जेवढ्या रुपयांमध्ये तुम्ही दोन महिन्यांचं इंटरनेट वापरू शकता तेवढेच पैसे तुम्हाला विमानातलं वाय-फाय वापरण्यासाठी मोजावे लागू शकतात.