बस चालवत असतानाच चालकाचा ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुत ही घटना घडली आहे. सोमवारी यशवंतपूरजवळ बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) चालकाचं दुःखद निधन झालं. किरण असं या 39 वर्षीय चालकाचं नाव आहे. बीएमटीसी डेपो 40 मध्ये काम किरण नेलमंगला ते यशवंतपूर दरम्यान बस चालवत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या त्याची शुद्ध हरपली.
अंगावर काटा आणणारी ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत चालक किरण अचानक बेशुद्ध होताना दिसत आहे. यावेळी बस रस्ता सोडते आणि शेजारुन जाणाऱ्या बीएमटीसीच्या बसला धडक देते.
बसमधील प्रवाशांना अचानक काय झालं हे समजत नाही आणि एकच आरडाओरड सुरु होते. यावेळी बसचा कंडक्टर प्रसंगावधान दाखवत चालकाकडे धाव घेतो. चालक बेशुद्ध पडल्याचं पाहताच तो उडी मारुन त्याच्या सीटवर बसतो आणि आधी बस थांबवतो. कंडक्टरने प्रसंगावधान दाखवल्याने सुदैवाने पुढील धोका टळतो. अन्यथा मोठ्या प्रमाणात जिवितहानी होण्याची शक्यता होती.
Heart Attack is a new epidemic in India!
39-year-old Bus driver fell on duty! Kudos to conductor’s reflex, he saved many lives! However, this poses a serious question to Indian Healthcare system! Is critical health screening easily and freely available?
https://t.co/DZlrKlzKfR— Citizens Movement, East Bengaluru (@east_bengaluru) November 7, 2024
यानंतर किरणला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. बीएमटीसीने कंडक्टरचं कौतुक केलं असून, त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानतेबद्दल पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या आरोग्य विश्लेषणातून दिसून आलं आहे की 45-60 वयोगटातील 7,635 BMTC कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका आहे. राज्य संचालित जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेसमध्ये हे मूल्यांकन करण्यात आलं.
बीएमटीसी आणि संस्था यांच्यातील सामंजस्य कराराच्या अंतर्गत आयोजित केलेल्या अभ्यासात, 5.5 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये ह्रदयविकारांसह मधुमेह, उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणाच्या स्थिती आहेत. BMTC येत्या काही महिन्यांत आणखी 2,500 कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करण्याची योजना आखत आहे, असे संस्थेचे संचालक डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी सांगितलं आहे.
"त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे, त्यांच्या येणारा तणाव जास्त आहे. सतत ड्रायव्हिंग, जास्त काम आणि रात्रीच्या ड्युटीमुळे खाण्याच्या अनियमित सवयी तसंच व्यायामासाठी मिळत नसलेला वेळ याचा परिणाम आरोग्यावर होतो," असं डॉ. सी.एन. मंजुनाथ म्हणाले.