Vlogger Maya Gogoi Killed in Bengaluru: बेंगळुरुच्या इंदिरा नगर येथील एका इमारतीत महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मामा गोगोई असं महिलेचे नाव असून ती एक व्लॉगर असल्याचे समोर आले आहे. ती महिला तिच्या कथित प्रियकरासोबत 23 नोव्हेंबर रोजी या इमारतीत राहण्यासाठी आली होती. ती मुळची आसाम येथील आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्लॉगर माया गोगोईच्या प्रियकरानेच 24 नोव्हेंबर रोजी तिची हत्या केली होती. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाले होते. त्यानंतर आरोपीने महिलेवर चाकुने हल्ला केला. आरोपीने तिच्या छातीवर वारंवार वार केले त्यात गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे मायाच्या हत्येनंतर आरोपी दोन दिवस तिच्या मृतदेहाशेजारीच बसून होता.
दोन दिवसानंतर सकाळी कॅब करुन आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. कर्मचाऱ्यांना इमारतीच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. तेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मृतक महिला तिच्या मित्रासोबत काही दिवस येथे राहायला आली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, माया कोरमंगला येथे काम करते.
पोलिस उपायुक्त डी देवराज यांनी म्हटलं आहे की, आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिस आणि फॉरेन्सिकचे पथक तिथे उपस्थित होते. पोलिसांनी मृतक महिलेची अधिक ओळख पटवण्यासाठी ती जिथे काम करते तिथे चौकशी केली आहे. तर आरोपी, केरळ येथे राहणारा आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती अद्याप मिळाली नाहीये.
दरम्यान, सप्टेंबरमध्येही बेंगळुरूत अशीच एक घटना घडली होती. येथील घरातील फ्रीजमध्ये 29 वर्षांच्या महालक्ष्मी नावाच्या महिलेचे मृतदेहाचे 30 ते 40 तुकडे सापडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 19 दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली होती. ज्या इमारतीत महालक्ष्मीचा मृतदेह सापडला तिथे ती पाच महिन्यांपूर्वीच भाडेकरु म्हणून राहायला आली होती. त्यामुळं शेजारीही तिला ओळखत नव्हते. ती सकाळी 9.30 वाजता घरातून निघायची आणि रात्री 10.30 वाजता घरी यायची. तिची आई आणि बहिण बेंगळुरुत राहत होते. 2 सप्टेंबरपासून अचानक महालक्ष्मीचा फोन बंद झाला. तेव्हापासून तिच्या आई आणि बहिण चिंतेत होत्या. तर, एकीकडे तिच्या घरातून दुर्गंधी यायला लागली होती.
20 सप्टेंबर रोजी घर मालकाने महालक्ष्मीच्या आईला फोन केला होता. त्यांना घरातून दुर्गंधी येते हे सांगितले. तेव्हा त्या तात्काळ दुसऱ्या मुलीला घेऊन घटनास्थळी निघाले. महालक्ष्मीच्या आईकडे नेहमी एक चावी असायची त्याच चावीने तिने घराचा दरवाजा उघडला. मात्र दरवाजा उघडताच आतून दुर्गंधींचा भपकारा आला. घरातील फरशीवर रक्ताचे डाग होते तर मृतदेहाचे तुकडेदेखील पडले होते. तेव्हा या घटनेचा खुलासा झाला होता.