नवी दिल्ली - भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा समाजामध्ये फूट पाडणारी आहे. त्यामुळे त्याला विरोध करून लोकांना एकत्र आणण्याचे काम मी पूर्ण मेहनतीने करेन, असे काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी यांनी अधिकृतपणे सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा एकसारखीच आहे. आणि या विचारधारेचा विरोध करण्यासाठी वेळ आली आहे. समाजात फूट पाडणाऱ्या या विचारधारेच्या विरोधात उभे राहून समाजाला एकसंध करण्याचे काम मी करणार आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाची रणनिती काय असेल, यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीला प्रियंका गांधींसह काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच उपस्थित होते.
पूर्व उत्तर प्रदेशचा पदभार मी काही दिवसांपूर्वीच स्वीकारला आहे. सध्या तेथे नेमकी काय स्थिती आहे. पक्षाचे काम काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न मी करते आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी मी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन हे आश्वासन तुम्हाला देते, असे प्रियंका गांधी यांनी यावेळी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस विजयी होता नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असेही प्रियंका गांधी यांनी या बैठकीत म्हटल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नव्हे तर २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठीही आतापासूनच रणनिती आखावी, अशी सूचना यावेळी राहुल गांधी यांनी दोघांना केली. सूत्रांकडून ही माहिती मिळाली.