व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. काही वेळा केवळ लोकांना भरकटवण्यासाठी काही मेसेज आणि व्हिडिओ शेअर केले जातात. आणि यावर डोळे झाकून विश्वासही ठेवला जातो. पण अनेकवेळा कोणताही विचार न करता ठेवला जाणार हा विश्वास एखाद्याचा घात करु शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. युट्यूबर पाहिल्या एका व्हिडिओवर (YouTube Video) विश्वास ठेवत एक तरुणाने लग्नासाठी चक्क 450 किलोमीटर प्रवास केला. पण जेव्हा तो तरण तिथे पोहोचला. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीच सरकली.
तरुणाने केला 450 KM प्रवास
उत्तर प्रदेशमधल्या बाराबंकी (UP Barabanki) इथला एक युवक मध्य प्रदेशच्या शिवपुरी इथं पोहोचला. या तरुणाचं लग्न जमत नव्हतं. त्याने युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओत मध्यप्रदेशमधल्या शिवपुरी (Shivpuri) इथं नववधुंचा बाजार भरतो, असं दाखवण्यात आलं होतं. या बाजारात तुम्ही लग्नासाठी मुलीची खरेदी करु शकता असं दाखवण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरुणाच्या लग्नाच्या आशा पल्लवीत झाल्या. या बाजारातून एका मुलीची खरेदी करुन तिच्याबरोबर लग्न करण्याचं स्वप्न हा तरुण पाहू लागला.
लग्नासाठी पोहोचला शिवपुरीत
लग्न करण्याच्या अपेक्षेत हा तरुण मध्यप्रदेशमधल्या शिवपुरीत इथं पोहोचला. पण सत्य कळताच त्याची निराशा झाली. सोशल मीडियावर भ्रम निर्माण करणारे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. असा नववधुंच्या बाजाराचा व्हिडिओ या तरुणानेही पाहिला होता. उत्तर प्रदेशमधल्या बाराबंकी इथं राहाणारा सोनेलाल मौर्यने हा व्हिडिओ पाहिला होता. 35 वर्षांच्या सोनेलालचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. शिवपुरीतल्या धडीचा प्रथेबद्दल या व्हिडिओत त्याने पाहिलं होतं. या व्हिडिओत धडीचा प्रथेत लग्नासाठी मुलींचा बाजार भरवला जातो असं दाखवण्यात आलं होतं.
शिवपुरीला पोहोचल्यानंतर सोनेलालला कुठेच अशा प्रकारचा मुलींचा बाजार दिसला नाही. त्यामुळे त्याने तिथल्या लोकांकडे या प्रथेबाबत विचारणा केली. पण कोणालाच याबाबत माहिती नव्हती. त्याचवेळी त्याची गाठ एका एनजीओ कार्यकर्त्याशी पडली. सोनेलालने धडीचा प्रथेबद्दल आणि मुलींच्या बाजाराबद्दल माहिती विचारली. पण असा कोणताही मुलींचा बाजार इथं भरत नसल्याचं त्याने सांगितलं. सोनेलालने आयटीआय केलं असून एका खासगी कंपनीत तो काम करतो. त्याला पगारही चांगला आहे, पण लग्न ठरत नसल्याने तो शिवपुरीमध्ये पोहोचला होता.
पण जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा सोनेलालची निराशा झाली. रिकाम्या हाताने सोनेलाल पुन्हा आपल्या बाराबंकी इथल्या गावी परतला. पण शिवपुरीत राहाणाऱ्या काही एनजीओ कार्यकर्त्यांनी धडीचा प्रथेबद्दल गैरसमज पसवले जात असून शिवपुरीचं नाव खराब होत असल्याचा आरोप केला आहे.