Ladki Bahini Yojana: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरु झालेली आणि सर्वाधिक चर्चेत असलेली सरकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! या योजनेअंतर्ग प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या योजनेअंतर्गत दोन हफ्ते म्हणजेच प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सप्टेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे. असं असतानाच सदस्य नोंदणीदरम्यान सरकारने बहिणींसाठी देऊ केलेल्या या पैशावर भावांचाही डोळा असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतेय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. आधारकार्डवर स्वत:च्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून पुरुषांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा सारा प्रकार कन्नड तालुक्यामध्ये घडला. या तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना 30 ऑगस्टच्या पडताळणीदरम्यान हा प्रकार समजला.
बहीणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या 12 भावांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता. सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणीदरम्यान हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
अशाप्रकारे या योजनेतून पुरुषांनी पैसे काढण्याचा केलेला हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने तब्बल 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करुन या योजनेअंतर्गत 30 वेगवेगळे अर्ज केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातही पडताळणीदरम्यान 30 अर्जांपैकी 26 अर्जांनाशी एकच बँक खातं संलग्न असल्याचं समोर आल्यानंतर या व्यक्तीचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई झाली. आरोपीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पनवेलमधील महिलांचे फोटो वापरले होते. आता अशाच प्रकारचं हे दुसरं प्रकरण समोर आलं आहे.