उस्मानाबाद : स्त्रियांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून स्त्रियांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समाज्यापुढे आहे. याचा प्रयत्य देणारी अजून एक घटना समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला असून या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आमिष दाखवून बलात्कार केल्याचे पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात ही १४ वर्षांची पीडित मुलगी राहत असून ती सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे.
याप्रकरणी या मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. सुधाकर साखरे आणि प्रशांत कलकेरी अशी या दोघांची नावे आहेत. सुधाकर साखरेने, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू जे काही मागशील ते मी तुला देईन असे सांगून बलात्कार केला, तर प्रशांत कलकेरीने तुला मोबाईल घेऊन देतो असे सांगून बलात्कार केला असे पीडित मुलीने सांगितले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्राकांत खांडवी, उमरगा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सुशीला कोल्हे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी विशेष पथकासह या मुलीचा जबाब इनकॅमेरा नोंदवला आहे. त्यानंतर या दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.