पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : महाराष्ट्रातील मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh)) सीमेवरचं शेवटचं गाव मोवाड (Mowad). नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड हे गाव. मोवाड म्हणजे सोन्याचं कवाड (दार) अशी म्हण होती. पण 32 वर्षांपूवी महापुराच्या (Flood) महाप्रलयात एका रात्रीच हे अख्ख गाव बेचिराख झालं होतं. कोलार आणि वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात महापूर आला आणि होत्याच नव्हतं झालं. या महापूरात 204 जणांना जलमसाधी मिळाली होती. आज गावाचे पुनर्वसन झालंय खरं पण महापुराने दिलेल्या जखमा तीन दशकांनंतर जशाच्या तशा अनेकांचा मनात घर करून बसलेल्या आहेत.
वर्ष 1991 जुलै महिना. सात दिवसांपासून धो धो पाऊस सुरू होता. तारीख 29 जुलैच्या रात्री स्वप्नातही काही भयानक होणार नाही विचार न करता गाव झोपी गेलं होतं. कारण गावाने त्यापूर्वी अनेक पूर पाहिले होते. पण 30 जुलै 1991 उजाडताना वरच्या भागात झालेला प्रचंड पावसानं वर्धा नदीनं रौद्र रूप धारण केलं. दगड मातीचा बंधारा फुटला आणि गावाला वळसा घालून जाणाऱ्या वर्धा नदीच्या पुराने गावात महातांडव सुरू केला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी उंच उंच घरावर जाऊन आसरा घेतला. आक्रोश किंचाळ्या...जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू होता. मात्र पुराचा वेढा वाढत जात होता. कोलार नदीच पाणी थोपल्याने पाणी पातळी वाढत गेली. नवीन ठिकाण शोधत असताना अनेकांना डोळ्यादेखत आप्तस्वकीयाना पुराचा पाण्यात जलसमाधी मिळत होती. एका घरावर 100 पेक्षा जास्त जण आसरा घेऊन होते. मात्र ती इमारतच महापुरात अलगद वाहत गेली. लोकांचा आक्रोश मृत्यच्या पुरात जातांनाचा तो क्षण आठवला अंगावर शहारा येतो असे कुटुंबीय सांगतात.
जेव्हा गावात महापुराचा महातांडाव थांबला तेव्हा अनेकांची घरे, घरातील जीववश्यक वस्तू सर्व काही गेलं होतंच. पण त्यातही कोणी आपले आई, कोणी बाबा, कोणी भाऊ यार कोणी पत्नी तर कोणी आपलं लहान बाळ शोधत होत. सरकार दरबारी 204 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात आधार आणि संसार गमावून बसलेल्यांची संनख्या याहून कितीतरी जास्त होती. यावरून या महापुराच्या महाप्रलयाची जखम किती खोलवर असले याचा अंदाज आजही बांधता येऊ शकत नाही.
मोवाड नगरपालिकेची स्थापना 17 मे 1867 ला झाली होती. त्याला 154 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्रजांच्या काळापासून इथली नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडमध्ये विणकरांची मोठी बाजारपेठ होती. सोबतच इथला बैलबाजार देखील संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होता. त्याकाळी येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत होते. मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे.
महापुरात गावाच वैभव वाहून गेलं आहे. आता गावाच पुनर्वसन झालं आहे पण बाजारपेठ ओटे दुकान तयार झालेत. गावात हातमागाचे 450 युनिट होते. मात्र आता चार मोडक्या तोडक्या घरात चार युनिट शिल्लक राहिले आहेत. गावाचं पुनर्वसन झाले असले तरी त्यात 450 एकर सुपीक जमीन गेल्यानं शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे रोजगाराचे साधन राहिले नाही. गावातील तरुण बाहेर जाऊन रोजगार शोधत आहेत. त्यामुळे पूर्वसन झालं पण पुन्हा तेच वैभव प्राप्त व्हावं अशी इच्छा गावकरी आजही व्यक्त करतात.