Indias Highest Waterfall In Maharashtra: सातारा (Satara) जिल्ह्यांला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठ्यांची पहिला राजधानी हा मान सातारा जिल्ह्याला आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली असताना नैसर्गिंक सौंदर्यही मिळालेले आहे. पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलून दिसते. याच जिल्ह्यात भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. गर्द रानात दडलेला हा फेसाळता धबधबा पाहण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करतात. पण अजूनही महाराष्ट्रातील नागरिकांना या धबधब्याविषयी फारशी माहिती नाहीये. तर आज तिथपर्यंत कसं जायचं, किती खर्च येतो, याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. (Bhambavli Vajrai Waterfall Tour Guide)
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असणारे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. भारतातील सर्वात उंच म्हणून ओळखला जाणारा भांबवली धबधबा (Bhambavli Vajrai Waterfall) ओसंडून वाहू लागला आहे. या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर इतकी आहे. या धबधब्याची वैशिष्ट्ये म्हणजे वरतुन कोसळणारे पाणी हे तीन टप्प्यात वाहत खाली येत असून सरळ उभ्या दगडावरुन पाणी खाली कोसळते. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. इथपर्यंत कसं जायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भांबवली धबधब्याला वजराई धबधबा असंही म्हणतात. उमरोडी नदी ही महाराष्ट्रातील भांबवली वजराई धबधब्याचा पायथा आहे. तीन पायऱ्या असलेला हा धबधबा बारामाही कोसळतो. कास तलाव या धबधब्यापासून अवघ्या 6 मिनिटांच्या अंतरावर आहे. मुसळधार पावसात या धबधब्याला भेट देणे टाळावे, असं अवाहन वन विभागाकडून करण्यात येते. भांबावली येथे जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे. जुलै व ऑगस्ट महिन्यातील काळ. या काळात येथील वातावरण अल्हाददायक असते. तसंच, तोपर्यंत पावसाचा जोरही कमी झालेला असतो.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. घनदाट जंगल आणि कडेकपारीतून वाट काढावी लागते. पायवाट निसरडी असल्याने जाताना घसरुन पडण्याचीही भीती असते. मात्र अलीकडेच वनविभागाने पायऱ्या व रेलिंगची सुविधा करण्यात आली आहे. तसंच, प्रशासनाने वॉच टॉवर आणि पॅगोडाचे कामही केले आहे. त्यामुळं पर्यटकांना निसर्गांचा आनंद लुटता येतो.
भांबवली वजराई धबधबा व्यवस्थापन वनसमितीच्या माध्यमातून पाहिले जात आहे. धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारले जाते. इतकंच नव्हे तर, येत्या काळात पर्यटकांसाठी बांबू गेस्ट हाऊसचे कामही करण्यात येणार आहे, अशी माहिती कळतेय.
रेल्वे मार्ग
सातारा जिल्ह्यात हा धबधबा येतो. सर्व प्रकारच्या वाहतुकीने तुम्ही सहज पोहोचता येते. सातारा रेल्वे स्थानकाबाहेर कॅब किंवा गाडी भाड्याने घेऊ शकता. तुम्हाला धबधब्यावर पोहोचण्यासाठी 1 तास 15 मिनिटे लागतील.
रस्ते मार्गे
सातारा येथून भांबवली - 32 किमी दूर आहे. १) सातारा-कास -कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जावे लागते. किंवा (2) महाबळेश्वर ते तापोळा ते बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली).
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतातील सर्वात उंच धबधबा असलेल्या वजराईला भेट देणे योग्य ठरेल
धबधब्याजवळ कोणतेही मांसाहारी पदार्थ खाऊ नका
प्लास्टिक बंदी असल्याने धबधब्याभोवती कचरा टाकू नका
ट्रेकिंगचे शूज घाला कारण तिथे जाण्यासाठी जागा निसरडी आहे
योग्य आणि आरामदायक कपडे घाला.