सोनई हत्याकांड : आरोपी पोपट करंजलेच्या कारागृहातील हत्येचं गूढ

पोपटला अर्धांगवायूचा झटका आला होता मात्र तरीही त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं नाही.

Updated: Jul 2, 2018, 08:50 PM IST

अहमदनगर : अहमदनगरच्या सोनईमधल्या तिहेरी दलित हत्याकांडातला आरोपी पोपट करंदलेचा २४ जून रोजी नाशिक कारागृहात मृत्यू झालायं.  हृदयविकाराचा झटका असं याचं कागदोपत्री याचं कारण दिलं गेलं. मृत्यू होण्यापूर्वी चार दिवस आधीच पोपटला अर्धांगवायूचा झटका आला होता मात्र तरीही त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं नाही. त्याला योग्य वेळी उपचार मिळाले असते तर तो बचावला असता, असं त्याच्या नातलगांचं म्हणणं आहे.

खळबळजनक आरोप 

पोपटला योग्य उपचार मिळावेत, यासाठी कारागृहात याच खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अन्य कैद्यांनी उपोषण केलं होतं. मात्र आपल्याला उपचारांची गरज नसल्याचं कारागृह प्रशासनानं पोपटकडून लिहून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आलीये . त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती फोन करून तत्काळ देता आली असती, मात्र त्याऐवजी घरी पोलीस पाठवून माहिती देण्यात आली. आता किमान अन्य कैद्यांच्या बाबतीत असं दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा पोपट करंदले यांच्या नातलगांनी व्यक्त केलीये. कारागृहातील आरोपीना मानवतेच्या दृष्टी कोनातून वागणूक दिली जात नसल्याच्या अनेक गंभीर तक्रारी झाल्यात. तसंच कैद्यांपर्यंत मनी ऑर्डर किंवा पत्र पोहोचवली जात नसल्याचाही आरोप होतोय. कैद्यांना माणूस म्हणून वागवलं जावं, अशी किमान अपेक्षा त्यांच्या नातलगांकडून व्यक्त केली जातेय.