सातारा : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले. सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांना रात्री ९ वाजता संतोष जाधव हे महाबळेश्वर सातारा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. जाधव हे दुचाकीवरून जात असताना रानडुक्कराने अचानक धडक दिल्याने रस्त्यावर निर्जन ठिकाणी अपघात होऊन पडले होते. त्याच रस्त्याने महाबळेश्वरवरुन एक विवाहसोहळा उरकून जाणाऱ्या अजित दादा पवार यांच्या लक्षात ही गोष्ट आली अजितदादांनी तातडीने स्वतःची गाडी थांबवून बेशुद्ध जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना मदत केली. त्यांनी युवा कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून स्वतःच्या गाडीमधून सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटिल जिल्हा रुग्णालय येथे पोच करण्याची व्यवस्था केली आणि स्वतः फ़ोन वरून डॉक्टराना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. अजित पवारांचे माणुसकीचे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने दर्शन झाले.