अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भामरेंसोबतची चर्चा निष्फळ

बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होती.

Updated: Feb 4, 2019, 09:14 PM IST
अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भामरेंसोबतची चर्चा निष्फळ title=

अहमदनगर: राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन महाजन, तर पंतप्रधान मोदी यांचे पत्र घेऊन भामरे हे अण्णांना भेटले. बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आणि अण्णा हजारे यांनी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. यानंतर अण्णा हजारे ग्रामसभेसाठी रवाना झाले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.

या चर्चेनंतर डॉ. सुभाष भामरे आणि गिरीश महाजन दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. भामरे यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली. केंद्राचा प्रतिनिधी म्हणून आलो. सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. उद्यापर्यंत त्यांचा निर्णय स्पष्ट होईल, असे भामरे यांनी सांगितले. तर महाजन यांनीदेखील उद्या दुपारपर्यंत अण्णा हजारेंच्या मागण्या पूर्ण होतील अशी माहिती दिली. तसेच लोकायुक्त संदर्भात नवीन मसुदा तयार करण्याची अण्णा हजारेंची मागणी मान्य केली आहे. कृषीमूल्य आयोगाबाबत अद्याप अण्णांचे समाधान झालेले नाही. लोकपाल आणि लोकायुक्तबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

तत्पूर्वी अण्णांनी लोकपालच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या भाजप सरकारवर कडाडून टीकाही केली. लोकपालच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनामुळेच भाजपला सत्ता मिळाली. मात्र, आज तेच सरकार जनतेशी गद्दारी करत आहे. लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचे आश्वासन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरलेत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.