ST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर आहे. यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी केले.ते पंढरपूर येथे यात्रेनिमित्त एसटीने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक एसटी प्रशासनाला सुचना देताना ते म्हणाले.
" यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना यात्रा बसस्थानकावरील सोई-सुविधांची व्यवस्था करावी, बसेस चिखलात अडकून पडणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची पार्किंग करण्यात यावे. तसेच आपल्या एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. " याबरोबरच जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाची तसेच नैसर्गिक विधीची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना कुसेकर यांनी स्थानिक प्रशासनात दिल्या आहेत.
विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अर्थात, या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी 18 लाख भाविक-प्रवाशांची सुरक्षित वाहतूक मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त 4245 विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये 18 लाख, 30 हजार, 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) श्री. शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक ( बांधकाम) श्री. दिनेश महाजन, उप महाव्यवस्थापक सौ. यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, सोलापूर श्री. विनोद भालेराव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
1 चंद्रभागा बसस्थान - मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
2 भिमा यात्रा देगाव - छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश
3 विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
4 पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग