औरंगाबाद : विधानसभा निवडणूक 2019 साठी एमआयएमने आपली 5 वी यादी जाहीर केली आहे. एमआयएमने परभणी,बीड, नागपूर कोल्हापूर औरंगाबाद अहमदनगर येथील आपले उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यांनी आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेऊन एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमची ताकद असलेल्या 50 जागांवर उमेदवार उभे करु असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे.
एमआयएमसाठी सर्व दरवाजे खुले असून ज्यांनी दरवाजे बंद केले होते त्यांनीच ते खोलावेत असेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. ते लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आमच्या समितीशी संपर्क साधून चर्चा करावी त्यातून नक्कीच योग्य मार्ग निघेल असा विश्वासही आंबेडकर यांनी व्यक्त केला.
मात्र लोकसभेत वंचित आघाडीला मिळालेली मते ही नॉन मुस्लिम होती असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान वंचित आघाडी ही राज्यातील ०१ कोटी ४० लाख मतदारांपर्यंत पोहोचली असून आणखी २० ते २५ लाख मतदारांपर्यंत पुढील १०-१२ दिवसात पोहचून राज्याची पुढील सत्ता मिळवू असा दावाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यावर वंचित आघाडी ठाम असल्याने आमची युती तुटल्याचे इम्तियाज यांनी म्हटले होते. ओवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचं आपणास सांगितल्याचे ते म्हणाले होते. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतला असल्याचं एका कार्यक्रमात जाहीर केले होते.