सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात सुरु झालेलं लोण पाहता पाहता राज्याच्या अनेक भागात पसरलं आणि त्यातून धुळ्यात पाच निष्पापांचा बळी गेला. या अफवांची ग्रामीण भागात कशी दहशत आहे.
'सावधान मुलं पळवणारी टोळी आलीय', 'टोळी लहान मुलांचं अपहरण करुन विक्री करते'. 'लहान मुलांचे अवयवही विकले जातात'...अशाच आशयाचे एक ना अनेक मेसेज सध्या राज्याच्या विविध भागात फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून व्हायरल होतायत. या मेसेजमुळेच सध्या ठिकठिकाणी भीतीचं वातावरण पसरलंय. विशेषतः ग्रामीण भागात अशा अफवांचे अधिक पेव फुटलंय. त्यामुळे अशा भागातले नागरिक रात्र जागून काढतायत. सर्वात आधी नांदेडमध्ये या अफवा सुरु झाल्या आणि मग त्याचं लोण राज्यभरात पसरलं.
मुलं पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार आदी ठिकाणी समोर आल्यात. भिकारी, भंगार वेचणारे आणि परप्रांतियांना संतप्त जमावाकडून मारहाण झालीय. विशेष म्हणजे ज्या नांदेडमध्ये अफवांमुळे हा प्रकार सुरु झाला तिथं मुलं पळवल्याची एकही घटना घडली नव्हती. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आणि त्यात निष्पांपांना बेदम मारहाण करण्यात आली. धुळ्यात पाच जणांचे बळी गेल्यानंतर तरी लोकांनी आता जागं होण्याची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. या घटनांतून धडा घेऊन लोकांनी सोशल मीडियावर विश्वास न ठेवता सद्सदविवेकबुद्धीचा वापर करणे गरजेचं आहे.