Exclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात. 

Updated: Jan 7, 2025, 09:34 PM IST
Exclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट  title=

Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 (विशाल करोळे, झी 24 तास परळी) : कोळसा जाळून त्यापासून वीज निर्मिती केली जाते. कोळसा जाळल्यावर उरते फक्त राख... याच राखेवर परळीची राजकीय गुन्हेगारी उभी राहिली. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायानं जो राखेवर ताबा सांगेल तो मालक असा मामला आहे. परळीतल्या या राखेच्या डोंगरांच्या वर्चस्वाचा संघर्ष रक्तरंजित आहे. 1995 साली औष्णिक विद्यूत केंद्र सुरु झालं. खरं तर औष्णिक विद्युत केंद्रातली राख त्यांच्यासाठी डोकेदुखी... ही राख कुणीही फुकट घेऊन जावी यासाठी ती बाहेर मोकळ्या जागेवर टाकली जाते. तिथूनच सुरु होतो राखेचा रक्तरंजीत खेळ. राख फुकट आहे पण त्यावर परळीचं राजकारण आणि अर्थकारण चालतं. गेल्या काही वर्षांपासून परळीच्या राखेच्या ढिगातून कोट्यवधी रुपयांची कमाई सुरु झालीये. राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्याचा बुरखा पांघरुन फिरणाऱ्या गुंडांनी राखेचा बाजार मांडलाय. स्थानिक पुढारी राखेचे व्यापारी झालेत. एक ट्रक राख 20 ते 25 हजारांना विकली जाते. राखेच्या ढिगांमुळं काही गुंडांच्या घरी लक्ष्मी पाणी भरु लागलीये. रोज या भागात शेकडो हायवा चालतात.

राखेच्या ढिगाऱ्यांजवळ दाऊदपूर नावाचं गाव आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गोपीनाथ मुंडेंनी नाकाबंदी केली होती. पण दाऊदपूर गावातल्या घराघरात दहशतीचा दाऊद आहे. राखेचे ढिगारे राखण्यासाठी कुणाचा जीव घ्यायलाही इथले माफिया मागंपुढं पाहात नाही. राखेतून पैसा मिळत असला तरी दाऊदपूरची राखरांगोळी झालीये. कधीकाळी दाऊदपूर हिरवंगार होतं. सरकारचा वनश्री पुरस्कार गावाला  मिळाला होता. पण राखेच्या अर्थकारणासमोर गावाभोवतीची हिरवाई टिकली नाही. इथल्या खदानीतही राख भरलीये.

राखेच्या ढिगातून जी राख उडते तिचा शेजारच्या वडगावच्या लोकांना प्रचंड त्रास होतो. राखेच्या ट्रकांच्या वाहतुकीमुळं गावकऱ्यांचा श्वास गुदमरलाय. या गावात आल्यावर सगळीकडं तुम्हाला पांढ-या राखेची चादर घरादारांवर दिसते. राखेची धूळ तुम्हाला श्वास घेऊ देत नाही. राखेविरोधात काही बोलाल तर तुम्हाला राख माफिया जगू देत नाही. वडगावच्या प्रत्येक गावक-याच्या चेह-यावर तुम्हाला दहशत दिसते. कोणीही बोलायला तयार नाही. काही बोललं तर कंबरेला पिस्तूल लावून बसलेला पिस्तूलबाज तुमची घराच्या दरवाजाबाहेर वाट पाहत असतो. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राख माफिया गायब झालेत. त्यामुळं वडगावातील लोकांना बोलण्याची थोडीफार हिंमत आलीये.

राख माफियांविरोधात फार कुणी बोलायला तयार नाही. राख माफियांच्या दहशतीबाबत हनुमंत चौधरी हे वृद्ध एक भीषण वास्तव सांगतात. तुम्ही राख माफियांबाबत काहीही जाहीर बोललात की रात्री तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवलीच जाणार याची गॅरेंटी असल्याचं सांगतात. माफियांच्या भीतीनं या गावातल्या प्रत्येकाच्या तोंडावर कुलूप घातलंय. कित्येकांचा आवाज राख माफियांनी बंद केलाय. काही जण गायब झाले. काहींचे अपघात घडवले. कुणाकुणाची तर कुटुंबच गायब केली. पण यावर कोणीही बोलायला तयार नाही. एखादेच हनुमंतअण्णासारखे लोक जीवावर उदार होऊन बोलतात.

राखेला सोन्याचा भाव आलाय ही बाब एव्हाना महाजेनकोच्या लक्षात आली होती. महाजेनकोनं राख विकण्याचा निर्णय घेतला. पण राखविक्रीचं टेंडर सरकार दरबारी धुळखात पडून आहे. राखेेचं टेंडरिंगच होऊ द्यायचं नाही. परळीचे माफिया हे सगळं राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं घडवून आणतायत.

राखेमुळं अनेकांची राखरांगोळी झाली असली तरी एक धंदा इथं जोरात फोफावलाय. हा धंदा आहे वीटभट्टीचा. राखेपासून विटा तयार करण्याचा धंदा जोरात वाढलाय. बीडमधून आजुबाजूच्या जिल्ह्यात वीटांची मागणी वाढू लागलीये. आता या वीटभट्ट्याही अधिकृत नाहीयेत बरं का...परळीजवळच्या शिरसाळा गावात शेकडो वीट भट्टया उभ्या राहिल्यात. या वीटभट्ट्या ज्या जमिनीवर सुरू आहेत, ती सगळी जमीन शासकीय आहे. गायरान जमिनीवर या भट्ट्या राजकीय नेत्यांकडून नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप होतोय. शून्य किंमत असलेल्या राखेतून विटा करून पैसा छापला जातोय. सुरेश धस यांनीही शिरसाळ्याची गायरान जमीन माफियांच्या घशात गेल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.

ज्यांना राखेच्या धंद्यात शिरकाव करता आला नाही ते वाळूच्या धंद्यात उतरले. वाळू लिलाव गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. बीडमधे मात्र वाळूउपसा खुल्लमखुल्ला सुरु आहे. वाळू माफियांची बीडमधील दहशत कुणालाही मोडता आलेली नाही. बीडमध्ये दिवसाढवळ्या वाळू उपसा आणि वाळूची वाहतूक सुरु आहे. महसूल विभागाती अधिका-यांचे खिसे भरले जातात. किंवा दहशतीमुळं काही करताच येत नाही. कारण प्रत्येकाला त्याचा जीव महत्वाचा वाटतो. काही पोलिस माफियांशी अर्थपूर्ण संबंध ठेऊन आहेत. पोलिसांच्या बदल्याच माफिया सेटिंग करवून घडवून आणतात. त्यामुळं माफिया परळी, बीडमध्ये बोलगाम झाल्याची स्थिती आहे.

(बीडचा माफियाराजची इनसाइड स्टोरी इथेच थांबत नाही वाचा PART - 2 Exclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट )