प्रविण तांडेकर, गोदिंया, झी मीडिया : काही दिवसांपूर्वी गोसे धरणाच्या बॅकवॉटर (Gosikhurd Dam Backwaters) पाण्यामध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. चकारा चिचाळ मार्गावर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले होते. भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara Crime News) पवनी तालुक्यातील गोसे धरणाकडे जाणाऱ्या चकारा चिचाळ मार्गावरील पुलाखाली शुक्रवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळला होता. धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अढ्याळ पोलिसांनी (Adyal Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला होता.
मृत व्यक्ती शौचालयास गेली असताना पाय घसरुन पाण्यात पडली असावी असा अंदाज पोलिसांनी सुरुवातीला लावला होता. त्यानंतर मृतदेह अड्याळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तपासानंतर संध्याकाळी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. यानंतर आता हा अपघात नसून हत्या असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून मित्रांच्या मदतीने मेव्हण्याने बहिणीच्या नवऱ्याला संपवल्याचे समोर आले आहे. मेव्हण्याने मित्रांच्या मदतीने मृत व्यक्तीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत पळसगाव येथे हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मृत मंगेश प्रेमलाल वाढई (34, रा. पळसगाव ता. साकोली) दारु पिऊन पत्नीला त्रास देत असे. त्यामुळे आपण त्याला संपवल्याची कबुली मेहुणा विलास केवलदास ऊके (30) याने दिली आहे. विलाससोबत पोलिसांनी प्रमोद नामदेव साकोरे (35), जितेंद्र मोतीराम अंबादे (35), सुरेंद्र प्रभाकर आगरे (32) यांनाही हत्येसाठी मदत केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींविरुद्धल खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
मृत मंगेशला दारुचे व्यसन असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवले होते. मात्र मंगेश व्यसनमुक्ती केंद्रातून पळून पळसगावला निघून गेला. त्यानंतर 25 जानेवारी रोजी मंगेशला त्याचा मेहुणा विलास हा व्यसनमुक्ती केंद्राच्या काही कर्मचाऱ्यांसह भंडाऱ्याला घेऊन गेल्याचे त्याच्या आईने सांगितले. मात्र 27 जानेवारी रोजी मंगेशचा मृतदेह गोसे प्रकल्पाकडे जाणाऱ्या पुलाखाली आढळून आला होता.
दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवत मेहुणा विजय ऊके आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपांनी खुनाची कबुली दिली. खून करुन मंगेशचा मृतदेह पुलाखाली पिकअप वाहनाने टाकल्याची कबुली आरोपींनी दिली.