जयेश जगड, अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या एका माजी सैनिकाने भाजप आमदारावर शेतरस्ता अडवत दादागिरी केल्याचा आरोप केला आहे. माजी सैनिक लक्ष्मीनारायण दुबे. ७८ वर्षीय दुबे यांनी १९६५ आणि १९७१ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पराक्रम गाजवला. कधी काळी सीमेवर पराक्रम गाजवणाऱ्या या सैनिकाचा आज मात्र व्यवस्थेशी संघर्ष सुरू आहे. लक्ष्मीनारायण यांना केंद्र सरकारने १९७२ मध्ये मुर्तिजापूर तालुक्यातील परसोडा शिवारातील गट क्रमांक पंधरामधील १.५५ हेक्टर शेती दिली होती. मात्र हाच शेतरस्ता मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी अडवल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.
दुबे यांच्या शेताला लागूनच माजी सैनिक विधवा देवकाबाई चहाकर यांची सव्वातीन एकर शेती आहे. हीच शेती आमदार हरिष पिंपळे यांनी पत्नीच्या नावे विकत घेतली. या ठिकाणी त्यांनी शेतरस्त्याच्या सुरूवातीला तारकंपाऊंड लावत लोखंडी दरवाजा लावला. यासंदर्भात दुबे यांनी सर्व पातळ्यांवर तक्रार केली. मात्र कुठेच न्याय मिळाला नसल्याचा दुबे यांचा आरोप आहे. दरम्यान, आमदार हरिष पिंपळे यांनी दुबे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
सध्या देशात प्रत्येकाचे देशप्रेम उफाळून आले आहे. प्रत्येकजण देशभक्त असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत एका माजी सैनिकाची व्यवस्थेकडून होणारी उपेक्षा भूषणावह नाही. या माजी सैनिकाला तातडीने न्याय देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.