'...तर पवार-पृथ्वीराजच त्यांच्या पक्षात राहतील'; अमित शाहंचा निशाणा

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सोलापूरमध्ये झाली.

Updated: Sep 1, 2019, 11:00 PM IST
'...तर पवार-पृथ्वीराजच त्यांच्या पक्षात राहतील'; अमित शाहंचा निशाणा title=

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सोलापूरमध्ये झाली. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहदेखील उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या प्रवेशावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. 'चंद्रकांत पाटील यांना माझ्यासारखे काही लोक रोखत आहेत. पण चंद्रकांतदादांनी भाजपचा संपूर्ण दरवाजा उघडला, तर फक्त पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहतील,' असा टोमणा अमित शाह यांनी लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीची राजवट एवढी वर्षं असताना त्यांनी काय केलं, असा सवाल शाह यांनी केला. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी अनुच्छेद ३७०वर आपली भूमिका पवार आणि राहुल गांधींनी स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. या सभेत मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईन, असं सांगितलं तर शाह यांनीही याला स्पष्ट शब्दांत दुजोरा दिला.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सोहळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  यामध्ये जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचा समावेश होता.

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्याच्या माण-खटावमधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. पण त्यांनी ३० ऑगस्टरोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणा जगजित सिंग हे कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राणा जगजित सिंग हे मुंबईमध्ये त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले धनंजय महाडिक यांनीही हातात भाजपचा झेंडा घेतला.