यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव च्या जंगलात वनविभागाने नरभक्षक टी वन वाघिणीच्या दोन बछड्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. १३ ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी अर्थात टी-वन वाघिणीला ठार मारल्यानंतर आठवडा उलटला तरी अद्याप तिचे बछडे वनविभागाच्या हाती लागलेले नाहीत.
साधारणतः ११ महिने वयाच्या या दोन्ही बछड्यांना सुखरूप पकडण्याचे मोठे आव्हान आता वनविभागापुढे आहे. टी-वन वाघिणीच्या शवविच्छेदन अहवालात तिला पुरेसे अन्न मिळाले नसल्याचे नमूद आहे. त्यामुळे आता तिच्या बछड्यांची उपासमार होऊ नये याची काळजी वनविभागाला घ्यायची आहे.
तर या बछड्यांना शिकार करता येत नाही, हे समजून घेऊन वनविभागाने वाघीण आणि तिच्या दोन्ही बछड्यांना जेरबंद करायला हवे होते. मात्र आता आईविना या बछड्यांची उपासमार होण्याची भीती प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, दोन्ही बछड्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले त्या त्या भागात बछड्यांसाठी प्राण्यांचे सावज बांधून वनविभाग शोधमोहीम राबवित आहे.
टी-वन वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य आहेत. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.
ही समिती टी-वन वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीनं अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहेत.